श्रीगोंदा (प्रतिनिधी) महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयात विविध स्पर्धा परीक्षेत यशस्वी ठरलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. या समारंभाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री बबनराव पाचपुते होते. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाबासाहेब भोस, महावीर पटवा, बाळासाहेब महाडिक यांच्या प्रमुख उपस्थितीत यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रकाश साळवे यांनी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी मंत्री बबनराव पाचपुते म्हणाले की, "आई-वडिलांच्या कष्टाची आठवण ठेवा. तुम्ही सर्व यशस्वी विद्यार्थी संघर्षातून आलात याची जाणीव ठेवा. जीवनात संघर्ष आणि कष्ट असेल तरच माणूस मोठा होतो. चांगलं काम करा. मोठे होण्याचे स्वप्न पहा. संधीचे सोने करा," असे विचार त्यांनी मांडले.
जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाबासाहेब भोस यांनीही यशस्वी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले की, "प्रतिकूलतेतूनच माणूस मोठा होतो. सतत कष्ट केल्यामुळेच आपण यशस्वी झालात. महाविद्यालयाची ही यशाची परंपरा अशीच सुरू राहो," असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.
याप्रसंगी पुढील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. महाराष्ट्र पोलिस सेवेत प्रगती मुसळे, प्रियंका दरवडे, यशोदा म्हस्के, निशांत एकमले, अश्विनी हिरडे, मनीषा कापसे, सावरी खडके, स्वप्निल चौधरी, क्रांती रसाळ, फुलाबाई पवार यांची निवड झाली. अरबाज शेख यांची राज्य राखीव पोलीस बलात निवड झाली. सौरव खळे यांची पॅरा कमांडो पदी निवड झाली. प्रदीप गोडसे, नूतन वागस्कर, राहुल दरेकर यांची महसूल सहाय्यक पदी निवड झाली. कु. संगीता आढाव यांची शासकीय मुलींच्या वसतिगृहात अधीक्षक पदी निवड झाली. ऋषिकेश नांगरे यांची इंडियन आर्मीत निवड झाली. या सर्वांचा सत्कार करण्यात आला.
पॅरा कमांडो ऋषिकेश नांगरे या यशस्वी विद्यार्थ्याने मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक प्रो. डॉ. राजाराम कानडे यांनी केले. या प्रसंगी महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर सेवक व विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. संजय फटे यांनी केले. कर्मवीर भाऊराव पाटील स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे चेअरमन प्रा. अनिल ढवळे यांनी आभार मानले.