रयत शिक्षण संस्थेच्या महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. राष्ट्रीय सेवा योजना (NSS), विद्यार्थी कल्याण मंडळ आणि राष्ट्रीय छात्र सेना (NCC) यांच्या संयुक्त विद्यमाने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
यानिमित्ताने महाविद्यालयापासून ते महात्मा फुले चौकापर्यंत भव्य पदयात्रा काढण्यात आली. "छत्रपती शिवाजी महाराज की जय" अशा घोषणांनी श्रीगोंदा शहर दुमदुमून गेले होते. कार्यक्रमाची सुरुवात प्राचार्य डॉ. प्रकाश साळवे यांच्या हस्ते शिवप्रतिमेचे पूजन करून करण्यात आली.
कार्यक्रमाच्या प्रारंभी विद्यार्थिनी ऐश्वर्या रवींद्र शितोळे देशमुख हिने स्फूर्तिदायक पोवाडा सादर केला. रेणुका कांतीलाल शिंदे आणि प्रांजल रंगनाथ दळवी या विद्यार्थिनींनी महाराजांच्या जीवन चरित्रावर भाषणे केली. प्रमुख वक्ते डॉ. राहुल गायकवाड यांनी शिवरायांचा राज्यकारभार आणि जीवनप्रवासावर प्रकाश टाकला, तर प्रा. अनिल ढवळे यांनी महाराजांच्या शौर्याच्या लढायांची माहिती दिली.
अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. प्रकाश साळवे म्हणाले की, "छत्रपती शिवरायांना निष्ठावंत मावळे लाभले. रयतेच्या कल्याणाचा, स्त्रियांच्या सन्मानाचा विचार करणारा छत्रपती शिवराय हा महान राजा होता. तरुण पिढीने शिवरायांचे विचार अंगीकारणे काळाची गरज आहे."
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. राजाराम कानडे यांनी केले, तर आभार राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी प्रा. भाऊ बुलाखे यांनी मानले. याप्रसंगी उपप्राचार्य डॉ. नितीन थोरात, डॉ. सुदाम भुजबळ, पर्यवेक्षक रत्नाकर झिटे, प्रा. उषा बोरुडे, डॉ. किरण ढवळे, डॉ. हरिभाऊ वाघिरे, प्रा. देवेंद्र बहिरम, प्रा. आर. जे. फटे यांच्यासह सर्व प्राध्यापक, एन.सी.सी. कॅडेट्स, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.