Logo
News.Rayat.in
महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालय श्रीगोंदा
📍 श्रीगोंदा • 📅 २८ फेब्रुवारी २०२६ • ✍️ डॉ. राजेंद्र ठाकरे
वैज्ञानिक दृष्टिकोन, नवोन्मेष आणि शाश्वतता या थीमवर पोस्टर सादरीकरण स्पर्धा; डॉ. संदीप पै यांचे विशेष व्याख्यान

महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा

रयत शिक्षण संस्थेच्या महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिन विविध उपक्रमांद्वारे उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये संशोधन वृत्ती आणि वैज्ञानिक दृष्टीकोन विकसित व्हावा या उद्देशाने वैज्ञानिक विषयांवरील पोस्टर सादरीकरण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.

दादा पाटील महाविद्यालयाचे प्रा. डॉ. संदीप पै प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्या हस्ते पोस्टर सादरीकरण स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. स्पर्धेत सुमारे ५० विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेत विविध वैज्ञानिक संकल्पना, संशोधन विषय तसेच पर्यावरणाशी संबंधित मुद्द्यांवर आधारित पोस्टर्स सादर केली. विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या "वैज्ञानिक दृष्टिकोन, नवोन्मेष आणि शाश्वतता" या मुख्य थीमवर आकर्षक पोस्टर सादरीकरण केले.

राष्ट्रीय विज्ञान दिन पोस्टर सादरीकरण

याच निमित्ताने "शैक्षणिक करिअरमध्ये संशोधनाचे महत्त्व" या विषयावर डॉ. संदीप पै यांचे विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. आपल्या व्याख्यानात डॉ. संदीप पै यांनी विद्यार्थ्यांना संशोधनाचे महत्त्व, वैज्ञानिक विचारसरणीची गरज आणि संशोधन क्षेत्रातील विविध संधी याबाबत मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, "आपण आपल्या मेंदूचा वापर करून समृद्ध बनूया. वैज्ञानिक जाणिवा विकसित करून राष्ट्रालाही समृद्ध बनवूया."

अध्यक्षीय भाषणात प्रभारी प्राचार्य प्रो. डॉ. प्रकाश साळवे यांनीही विद्यार्थ्यांना संशोधनाचे महत्त्व व वैज्ञानिक दृष्टिकोन अंगीकारण्याचे आवाहन केले. ते म्हणाले की, "विज्ञान दिन म्हणजे वैज्ञानिक शोधांचा उत्सव आहे. युवकांनी आपल्या वैज्ञानिक जाणिवा प्रगल्भ केल्या पाहिजेत. आपणच तर्कशुद्ध विचार करूया व तो समाजात रुजवूया. यातूनच समाज प्रगल्भ होईल. विज्ञान आणि शिक्षणाचे अतूट नाते असते. प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांना प्रश्न विचारण्याची सवय लावावी. वाचनाने वैज्ञानिक जाणीव प्रगल्भ होते. विज्ञानाचा वापर मानवी कल्याणासाठी व्हायला हवा. शेतीसाठी विज्ञानाचा वापर झाला पाहिजे."

डॉ. संदीप पै यांचे व्याख्यान

या कार्यक्रमाचे आयोजन विज्ञान मंडळाच्या वतीने करण्यात आले. कार्यक्रमाचे अभ्यासपूर्ण प्रास्ताविक प्रो. डॉ. राहुल गायकवाड यांनी केले, तर पाहुण्यांचा परिचय विज्ञान मंडळाचे समन्वयक डॉ. अजित इंगळे यांनी केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. प्रियांका म्हस्के यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. डॉ. अनुराधा ताटे यांनी मानले.

या कार्यक्रमप्रसंगी ॲड. विजया घोडके, उपप्राचार्य डॉ. सुदाम भुजबळ, उपप्राचार्य डॉ. नितीन थोरात, डॉ. राजेंद्र ठाकरे, डॉ. राजाराम कानडे, डॉ. रावसाहेब काळे, डॉ. हरिभाऊ वाघिरे, डॉ. किरण ढवळे, डॉ. अनुराधा ताटे, प्रा. माधुरी पानसरे तसेच सर्व विभाग प्रमुख, प्राध्यापक, विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.